नेहरूंच्या वास्तूंमध्ये बदल करून त्यांचे योगदान पुसण्याचे कारस्थान करू नका- मनमोहन सिंग

125

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दिल्लीतील नेहरू स्मृती संग्रहालय आणि वाचनालय (एनएमएमएल) आणि तीन मूर्ती स्मारक यांच्यात केल्या जाणाऱ्या प्रस्तावित बदलांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या वास्तूंमध्ये बदल करून नेहरूंचे योगदान पुसून टाकण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप सिंग यांनी केला आहे.

दिल्लीतील तीन मूर्ती संकुलात आजवरच्या सर्व पंतप्रधानांचे स्मारक आणि संग्रहालय उभे करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. त्याला काँग्रेसने विरोध केला आहे. त्या पाश्र्वभूमीवर सिंग यांनी मोदी यांना पत्र लिहिले आहे. या प्रकल्पातून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वारसा आणि योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका सिंग यांनी केली.

पत्रामध्ये सिंग यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, वाजपेयी यांनी नेहरूंच्या निधनानंतर संसदेत केलेल्या भाषणात नेहरूंबद्दल गौरवोद्गार काढले होते. नेहरूंसारख्या उत्तुंग आणि महान व्यक्तिमत्त्वाचे तीन मूर्ती भवनात पुन्हा वास्तव्य होऊ शकणार नाही, असे वाजपेयींनी म्हटले होते. सध्याचे सरकार मात्र नेहरूंचा अमीट वारसा पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. नेहरू हे केवळ काँग्रेसचे नव्हते तर ते संपूर्ण देशाचे होते.  तीन मूर्ती स्मारक आहे तसे जतन केल्याने आपण वारसा आणि इतिहासाचा आदर करणार आहोत, असे सिंग यांनी पत्रात म्हटले आहे.