नेहरुनगर येथे पूर्ववैमनस्यातून फळ विक्रेत्याला जबर मारहाण

109

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन चारजणांच्या टोळक्यांनी एका फळ विक्रेत्याला लाकडी दांडके आणि हाताने जबर मारहाण केली. ही घटना गुरुवार (दि.११) सायंकाळी साडेचारच्या सुमारास नेहरुनगर येथील आण्णासाहेब मगर स्टेडियमजवळ घडली.

शुभम राजु वाघमारे (वय १९, रा. विठ्ठलनगर) असे जखमी फळ विक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मुन्ना कांबळे (वय २१), आतीश कांबळे (वय २०), राजु (वय २०) आणि गणेश क्षिरसागर (वय २१) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम याचे नेहरुनगर येथील आण्णासाहेब मगर स्टेडियमजवळ फळ विक्रीचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी आरोपींचे शुभमसोबत भांडण झाले होते. याचा राग मनात धरुन आरोपींनी गुरुवार सायंकाळी साडेचारच्या सुमारास शुभम याला लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन जखमी केले. आणि पसार झाले. याप्रकरणी चौघांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे चौघे फरार असून पिंपरी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.