नेता, निती आणि रणनितीचा विरोधकांकडे अभाव – भाजप

91

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत व्हिजन २०२२ सादर केला. तसेच विरोधक हे हताश आणि हतबल झाले आहेत, असा टोलाही लगावत आम्ही पुनरागमन करणार असल्याचा दावा  केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. विरोधकांकडे न नेता आहे, न निती आणि रणनितीचाही अभाव आहे. त्यामुळे विरोधक हताश झाले आहेत.  त्यामुळेच त्यांनी नकारात्मक राजकारण सुरू केले आहे, असाही आरोप त्यांनी केला. 

आज (रविवार) कार्यकारिणीच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राजकीय प्रस्ताव सादर केला. तो प्रस्ताव सर्वसहमतीने मंजूर कऱण्यात आला. या प्रस्तावाणध्ये २०२२ पर्यंत ‘न्यू इंडिया’चे व्हिजन पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला. राजकीय प्रस्तावात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करण्यात आले. न्यू इंडियाचा उल्लेख करत हे  मिशन पूर्णत्वास आल्यास देशात न कोणी गरीब असेल आणि ना ही कोणी बेघर, असा विश्वास व्यक्त केला.

जगातील सर्वांत लोकप्रिय नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी यांचा गणना केली जाते, असे जावडेकर यांनी सांगितले. साडेचार वर्षांच्या कार्यकाळानंतरही मोदींची लोकप्रियता कायम आहे. जगात हे एकमेव असे उदाहरण आहे, असे ते म्हणाले. यावेळी पक्षाच्या विविध राज्यातील प्रमुखांनी आपल्या राज्यातील अभियान आणि कामांचा अहवाल सादर केला.