नीरव मोदी राहुल गांधींना भेटला होता; शहजाद पूनावालांच्या आरोपामुळे खळबळ  

287

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – देश सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरूण जेटली यांना भेटलो होतो, असा गौप्यस्फोट उद्योगपती विजय मल्ल्या यांने केल्यानंतर काँग्रेस –भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तर आता पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून पसार झालेला नीरव मोदी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना भेटला होता, असा आरोप काँग्रेसचे माजी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते शहजाद पूनावाला यांनी केला आहे.  

राहुल गांधी यांनी आज (गुरूवार) पत्रकार परिषद घेऊन विजय मल्ल्या देश सोडून पळून जाणार हे अरूण जेटलींना ठाऊक होते, असा आरोप केला आहे. या आरोपाला उत्तर देताना शहजाद पूनावाला  यांनी राहुल गांधी यांना आव्हान दिले आहे. राहुल यांनी नीरव मोदीची भेट नाकारून दाखवावी. सप्टेंबर २०१३ मध्ये नीरव मोदी आणि राहुल गांधी यांची एका हॉटेलमध्ये भेट झाली. त्यावेळी मी तिथे हजर होतो. मी लाय डिटेक्टर चाचणी करायलाही तयार आहे. तुम्ही माझे आव्हान स्वीकारणार का? असा सवाल शहजाद पूनावाला यांनी केला आहे.

विजय मल्ल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. आता शहजाद पूनावाला यांनी राहुल गांधी आणि नीरव मोदी यांची भेट झाली असल्याचा दावा करून  खळबळ उडवून दिली आहे. आता पुनावाला याच्या आरोपांना  काँग्रेसकडून कसे उत्तर देणार हे  पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.