नीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश

52

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा गंडा घालून देशाबाहेर पसार झालेल्या नीरव मोदीचा रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत. कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवार) आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी अलिबागमधील एकूण १२१ अनधिकृत बंगले आणि मुरुडमध्ये १५१ अनधिकृत बंगले आहेत. नीरव मोदी, मेहुल चोक्सी, स्मिता गोदरेज, मधुकर पारेख आणि इतरांचे अनधिकृत बंगले या भागांमध्ये आहेत. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना नीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडण्याचे आदेश दिल्याचे कदम यांनी सांगितले.

अलिबागमधील किहीम या गावात नीरव मोदीचा बंगला आहे. तर मेहुल चोक्सीचा बंगला आवास या गावात आहे. सीआरझेडच्या तरतुदींनुसार नीरव मोदीचा बंगला पाडण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

अलिबागमधील एकूण २०२ अनधिकृत बंगल्यांवर कारवाई करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे. या प्रकरणात अलिबागमध्ये ६९ आणि मुरुडमध्ये ९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर अनेक सेलिब्रेटींचेही बंगले या यादीत आहेत. यावर कलम १५ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. यामध्ये १ लाख रूपये दंडापासून ५ वर्षे कैद अशा शिक्षेची तरतूद आहे.