‘नीट’ आणि ‘जेईई’ची परीक्षा वर्षातून दोनदा- प्रकाश जावडेकर

58

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – ‘नीट’ आणि ‘जेईई’ची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. या परीक्षा आता कॉम्प्यूटरवर घेतल्या जाणार असून जेईईची परीक्षा जानेवारी आणि मार्च तर ‘नीट’ची परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यात घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेतील प्रवेशाच्या दृष्टीने जेईई आणि नीट या महत्त्वाच्या परीक्षा असतात. या परीक्षा पूर्वी वर्षातून फक्त एकदाच व्हायची. यामुळे या परीक्षेत चांगले गूण नाही मिळाले तर विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष वाया जायचे. अखेर हे धोरण बदलण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळाने घेतला आहे. यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे ही परीक्षा आता ऑनलाइन होणार आहे. तसेच या परीक्षा आता वर्षातून दोन वेळा घेतल्या जातील. एका परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही तर काही महिन्यांनी होणाऱ्या दुसऱ्या परीक्षेत पुन्हा संधी मिळेल. यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घोषणा केली.

केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या निर्णयाचे शिक्षण तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांना दोन संधी मिळणार असून ऑनलाइन परीक्षेचा दिनांक स्वत:ला निवडता येणार आहे, याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल, असे शिक्षणतज्त्रांनी सांगितले.