निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांचा जेडीयूमध्ये प्रवेश  

225

पाटणा, दि. १६ (पीसीबी) – निवडणूक रणनितीकार आणि  इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी (आय- पॅक)चे संस्थापक प्रशांत किशोर यांनी आज (रविवार) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूमध्ये प्रवेश केला. पाटणा येथील नितीश कुमार यांच्या निवासस्थानी जेडीयूची बैठक झाली. यावेळी त्यांचा पक्षप्रवेश झाला. यामुळे  काँग्रेस आणि भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांना नंबर दोनचे पद देण्याचा शब्द दिल्याचे सांगितले  जात आहे. तसेच ते पक्ष आणि सरकार यांच्यात मध्यस्थीचे काम करणार आहेत. त्याचबरोबर  आगामी काळात प्रशांत किशोर निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे.  प्रशांत किशोर यांना काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाचे निकटवर्ती मानले जातात.

जेडीयूमधील प्रवेशाबाबत प्रशांत किशोर म्हणाले की, जेडीयूचा प्रस्ताव मला गेल्या अनेक दिवसांपासून होता.  मात्र, आता ही योग्य वेळ आहे. सरकारमध्ये असो वा पक्षात, नितीश कुमार जी जबाबदारी सोपवतील, ती मी योग्यरित्या पार पाडणार आहे.

दरम्यान, प्रशांत किशोर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी प्रचार यंत्रणा राबवली होती. ‘चाय पे चर्चा’ सारखा हिट कार्यक्रम असो की ‘अब की बार…’ सारख्या घोषणा या प्रशांत किशोर यांनी आखलेल्या रणनीतीचाच भाग होत्या.  तसेच बिहार विधानसभा निवडणुकीपुर्वी नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांना एकत्र आणण्यातही प्रशांत यांची महत्त्वाची भूमिका होती.  तसेच पंजाब आणि उत्तरप्रदेश विधानसभांच्या निवडणुकांसाठी प्रचाराची रणनिती आखण्याची जबाबदारी काँग्रेसने प्रशांत यांच्याकडे दिली होती.