निवडणूक आयोगाचे कार्यालय भाजपच्या मुख्यालयात स्थलांतर करा – आप खासदार

140

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना दिलेल्या क्लीन चीटवरुन विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर   निवडणूक आयोगाचे कार्यालय हे भाजपच्या मुख्यालयात स्थलांतर केले पाहिजे, अशी खोचक  टीका आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या भाषणातील वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे विरोधकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांना क्लिन चीट दिली होती. त्यानंतर विरोधकांनी  निवडणूक आयोगावर  भाजपसोबत असलेल्या संबंधांवरून टीका करण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान,  निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना पत्र पाठवून कार्यपध्दतीवर  नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे  निवडणूक आयोगात मोदी यांच्यावर कारवाई करण्याबाबत असलेले  मतभेद चव्हाट्यावर आले. त्यामुळे निवडणूक आयोग पक्षपातीपणाने  निर्णय घेत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.