निवडणुकीच्या वादातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षाने केला मातंग समाजातील तरुणाचा खून

710

सांगली, दि. ६ (पीसीबी) – ग्रामपंचायत निवडणुकीत मदत केली नाही म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षाने एका मातंग समाजातील तरुणाला जबर मारहाण करुन त्याचा  खून केला. ही घटना तासगाव तालुक्यातील वायफळे गावात घडली.

राजेश फाळके असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष राजेश पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.५) रात्री २०१७ मधील ग्रामपंचायत निवडणूकीत मातंग समाजातील मते पडली नाही. या रागातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेश पाटील याने राजेश फाळके यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत फाळके गंभीर जखमी झाल्याने त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आज (गुरुवार) पहाटे राजेश फाळके यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष राजेश पाटील याच्याविरोधात अॅट्रॉसिटी व हत्येचा गुन्हा तासगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या खूनाच्या निषेधार्थ मागास समाज व इतर संघटनांकडून वायफळे आणि तासगाव बंद पुकारण्यात आला आहे.