निवडणुका आल्या की पवार बोलतात – विनोद तावडे

33

मुंबई, दि.३ (पीसीबी) – बहुजन समाजाच्या मतांवर डोळा ठेवून पगड्या बदलणाऱ्या लोकांच्या राजकीय पत्रांना राज्य सरकारने उत्तर देण्याची गरज नाही, असे प्रत्युत्तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टिकेला सोमवारी दिले. शरद पवारांसारखे अभ्यासू नेते निवडणुका जवळ आल्या की, राजकीय वक्तव्य करतात, तोच हा प्रकार आहे, अशी टिप्पणी तावडे यांनी पवार यांच्या वक्तव्यावर केली.
राज्य सरकारने तेराशेपेक्षा अधिक शाळा बंदचा घेतलेला निर्णय हा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांशी सुसंगत नसून राज्याचे शैक्षणिक धोरण, असे कधीच नव्हते, अशी टीका पवार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केली होती. तावडे यांनी एका खासगी कार्यक्रमात आल्यावर त्याला उत्तर दिले. तावडे म्हणाले की, शरद पवार यांच्यासारखी अभ्यासू व्यक्ती निवडणुका जवळ आल्या की राजकीय बोलतात याचा जुना अनुभव आहे. तोच अनुभव पुन्हा आला आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर राज्य सरकारचा भर आहे. बहुजन समाजाच्या मतांवर डोळा ठेवून पगड्या बदलणाऱ्या लोकांच्या राजकीय पत्रांना सरकारकडून उत्तर देण्याची गरज नाही. दरम्यान, शुल्क नियंत्रण कायदा धाब्यावर बसवणाऱ्या आणि परवानगी नसताना आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करणाऱ्या शाळांविषयी शिक्षण विभागाला काही माहिती मिळाली तर, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील दुर्मिळ चित्रफितींचे नुकसान होऊ देणार नाही, असे तावडे यांनी सांगितले.