निवडणुका असलेल्या राज्यांना कोळसा देऊन महाराष्ट्राला अंधारात ठेवले – नवाब मलिक

100

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यात सध्या भाजपचे सरकार आहे. या राज्यात आता निवडणुका लागल्या आहेत. तिथे भारनियमन नको म्हणून महाराष्ट्राच्या वाट्याचा कोळसा या राज्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात १० तास अघोषित भारनियमन सुरू आहे. हे भारनियमन राजकीय आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

ज्या राज्यात निवडणुका आहेत, त्या जिंकण्यासाठी महाराष्ट्र अंधारात ठेवला जात आहे. या राज्यांसाठी भाजपने आपले राज्य अंधारात ठेवले आहे, असे नवाब मलिक म्हणाले. राजस्थानमध्ये दीड महिना भारनियमन सुरु होते, आता तिथे भारनियमन नाही. आपल्या राज्यात १० दिवस झाले भारनियमन सुरु झाले आहे, त्यामागे हे खरे कारण आहे, असा आरोप मलिक यांनी केला.

नर्मदा प्रकल्पातील ४०० मेगावॅट वीज गुजरातने आपल्याला देणे बंधनकारक असताना, ती वीजही मिळत नाही. त्यामुळे राज्यात कोळशाचा तुटवडा आहे. सरकार सांगते देशपातळीवर कोळशाचा तुटवडा आहे, हे खोटे आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे कंत्राटदार होते, ते आपल्या पत्नीला कंत्राट कसे मिळेल याच्याच मागे लागलेले असतात. त्यामुळे ऊर्जा खात्याची लुटमार सुरु आहे, असा हल्ला नवाब मलिक यांनी चढवला. ज्या ठिकाणी भारनियमन सुरू  आहे. त्याठिकाणी  राष्ट्रवादी काँग्रेस १२ तारखेला कंदिल आंदोलन करणार आहे, असे नवाब मलिक यांनी  यावेळी सांगितले.