निर्भया हत्याकांडातील दोषींची फाशी कायम; पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

31

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या दोषींची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या प्रकरणातल्या चारही दोषींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. न्यायालयाने निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात मागील वर्षी ५ मे रोजी चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. यानंतर या निर्णयाविरोधात दोषींच्या वकिलांतर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानेही या सगळ्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.
दोषींना फाशी मिळाल्यावरच देशाला दिलासा मिळेल अशी भावना निर्भयाच्या वडिलांनी व्यक्त केली. सरकारी वकिलांनी या प्रकरणातल्या दोषींना दिलेली फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचे अपील केले होते. ते मान्य करत सर्वोच्च न्यायालयानेही या चौघांची फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी फेटाळली आहे. फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी यासंदर्भातली ही याचिका होती जी फेटाळण्यात आली आहे.
दिल्लीत चालत्या बसमध्ये निर्भयावर सामूहिक बलात्कार झाला. बलात्कारानंतर नराधमांनी केलेले कृत्य अत्यंत भयंकर आणि माणुसकीला काळीमा फासणारे होते. तिला उपचारांसाठी दिल्लीत ठेवण्यात आले होते. तसेच तिला देशाबाहेर नेऊनही तिच्यावर उपचार करण्यात आले होते. मात्र ती वाचली नाही. या प्रकरणात एकूण ६ जण दोषी होती. ज्यापैकी एकजण अल्पवयीन होता. तर एक दोषी राम सिंह याने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली. यानंतर ४ दोषींना दिल्ली उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयाविरोधात दोषींच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालयानेही ही याचिका फेटाळून लावत या चारही नराधमांची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.