निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ हॉटेल सुरु ठेवल्याप्रकरणी दोन हॉटेलवर कारवाई

121

वाकड, दि. १२ (पीसीबी) – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शासनाने हॉटेल आणि अन्य आस्थापना सुरु ठेवण्यासाठी वेळ निर्धारित केली आहे. त्यापेक्षा जास्त वेळ दुकाने सुरु ठेवल्यास कारवाई केली जात आहे. वाकड पोलिसांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या बाजूला मंगळवारी (दि. 11) रात्री एक वाजता दोन हॉटेलवर कारवाई केली आहे.

हॉटेल नीलकमल आणि हॉटेल साईदरबार या दोन हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. नीलकमल या हॉटेलवरील कारवाई मध्ये मोहम्मद मोईदुट्टी कल्लानाडी (वय 39, रा. ताथवडे, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक सुनील काटे यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी कल्लानाडी याने त्याचे हॉटेल शासनाने निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सुरु ठेवले. लोकांची गर्दी जमवून कोविड साथीचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हॉटेल साईदरबार या हॉटेलवरील कारवाई प्रकरणी साफीर मोईदुट्टी कल्लानाडी (वय 42, रा. ताथवडे, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक रजनीकांत कोळी यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीने त्याचे हॉटेल निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ सुरु ठेवले. याबाबत त्याच्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.