निरुपम यांना हटवून मिलिंद देवरांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष करण्याची मागणी

105

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना हटवून त्यांच्या जागी माजी खासदार मिलिंद देवरा यांना अध्यक्ष करण्यात यावे,  अशी  मागणी काँग्रेस नेत्यांनी   महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेस नेत्यांनी मुंबईत भेट घेतली. यामध्ये आमदार नसिम खान, अमिन पटेल, एकनाथ गायकवाड,  जनार्दन चांदूरकर,  सुरेश शेट्टी,  कृपाशंकर सिंह,  भाई जगताप आणि गुरुदास कामत गटाच्या इतर नेत्यांचा समावेश होता.

याबाबत जनार्दन चांदूरकर म्हणाले की, नवा अध्यक्ष कोण याबाबत निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी घेतील. गुरुदास कामत यांच्या निधनानंतर मुंबई काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी मतभेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, संजय निरुपम यांना बदलण्याची मागणी यापूर्वी मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी केली होती. मुंबई महापालिका निवडणुकीवेळी  मुंबई काँग्रेसमधील वाद उफाळला होता. त्यावेळी निरूपम यांना हटवण्याच्या मागणीने जोर धरला होता.