निम्म्या व्यापाऱ्यांना लखीमपूरमध्ये नक्की काय घडलं, हेच माहिती नाही….

63

– लाखीमपूरमध्ये जीपखाली चार जण चिरडले. शेतकऱ्यांनी पण, चार जणांना ठेचून मारलं, जर….

कोल्हापूर, दि.११ (पीसीबी) : लखीमपूर खेरीमधील हिंसाचाराविरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक का दिली, हे अनाकलनीय असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच व्यापाऱ्यांना लखीमपूर प्रकरणाची अर्धी बाजू माहितीच नसल्याचा दावाही पाटील यांनी केला.

निम्म्या व्यापाऱ्यांना लखीमपूरमध्ये नक्की काय घडलं, हेच माहिती नाही. त्यांना या प्रकरणाची केवळ अर्धी बाजू माहित आहे. लखीमपूर घटनेत जीप घुसली, त्यामध्ये चार जण चिरडले गेले, अत्यंत दुर्दैवी घटना आहे, अमानवी आहे. शेतकऱ्यांनी त्याची रिअॅक्शन म्हणून चार जणांना ठेचून मारलं, त्यानंतर केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचा मुलगा त्या कारमध्ये असता तर त्यालाही मारलं असतं, मी त्या खोलात जात नाही, कारण तो माझा विषय नाही. या सगळ्यात केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलाला अटक झाली, आता त्याची चौकशी होईल, मग त्यासाठी महाराष्ट्र बंद करण्याची गरज काय होती, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

व्यापाऱ्यांनी केवळ शिवसेनेच्या भीतीने दुकानं बंद ठेवली आहेत. आम्हाला काही माहिती नाही, दुकान सुरु ठेवले तर उगाच दगड पडायचा, अशी अनेक व्यापाऱ्यांची भावना असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे हा बंद सपशेल फसला आहे. भाजप या महाराष्ट्र बंदचा निषेध करते. राज्यातील जनतेला हे नाटक कळतंय, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.

लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. त्यापार्श्वभूमीवर आज राज्यात बंद पुकारण्यात आला आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी रस्त्यावर उतरुन या आंदोलनही केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी पत्रकार परिषद घेत भाजप सरकारवर घणाघाती टिका केली. तसेच, लखीमपूर घटनेतील मुख्य आरोपी आशिष मिश्राला भाजप वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, गुन्हेगारावर 302 अंतर्गत तात्काळ कारवाई करा आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना तातडीने मंत्रिमंडळातून काढण्यात यावे ही मागणी देखील यावेळी त्यांनी केली.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे खूप प्रश्न आहेत. राज्यात दोन मोठी वादळं येऊन गेलेत. वादळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या नुकसानभरपाईचे आणि कर्जमाफीचे काय, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. एखाद्या सरकारने सत्तेत असताना बंदची हाक देण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडतोय. महाविकासआघाडीचे कार्यकर्ते व्यापाऱ्यांना भेटून दुकानं बंद करायला सांगत आहेत, दंडुके घेऊन फिरत आहेत. दुकानं बंद ठेवा नाहीतर परिणाम भोगा, अशा इशारा देत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

WhatsAppShare