निधी कमी पडू देणार नाही – अजित पवार

76

पुणे, दि. २२ (पीसीबी) – “डॉक्टर, रुग्णवाहिकांची उपलब्धता याबाबतची माहिती घेताना निधी लागत असेल तर मागणी करावी, लगेच उपलब्ध करून देता येईल,” असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.

पुण्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. राज्यात मुंबईपाठोपाठ पुण्यातील स्थिती काळजी करण्यासारखी बनली आहे. पुणे जिल्हा प्रशासन आणि पुणे महापालिकेच्या वतीनं करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याचाच भाग म्हणून महापालिकेनं वॉर रूम प्रणाली कार्यपद्धत सुरू केली आहे. याची पाहणी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. यावेळी अजित पवार यांनी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर पालिकेने डॅश बोर्ड (वॉर रूम) प्रणाली विकसित करण्यात आली आहे. याठिकाणी अत्याधुनिक संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली असून, करोनबाधित रुग्ण, शहरातील करोनाबाधित क्षेत्र, वाढत असलेला परिसर याबाबतची अद्यावत माहिती याठिकाणी संकलित केली जात आहे. त्यामुळे उपाययोजना करण्यास प्रशासनाला सोपं जातं आहे. या प्रणालीविषयी मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. “ही प्रणाली उत्तम आहे. एखाद्या करोनाबाधित नागरिकांचा फोन आला, तर तत्काळ रुग्णवाहिका पोहचली पाहिजे. भविष्याच्या दृष्टिकोनातून बालेवाडीप्रमाणे अन्य ठिकाणी कोव्हिड सेंटर कार्यान्वित केले पाहिजे,” असं ते म्हणाले.

यावेळी अजित पवार यांनी पुण्यात सापडलेल्या पहिल्या रुग्णांच्या सध्याच्या स्थितीविषयी चौकशी केली. “आपण त्यांच्या सतत संपर्कात असतो. रोज चार ते साडेचार हजार लोकांना फोन केला जातो,”असं आयुक्तांनी सांगितलं.

WhatsAppShare