निगडी येथे ट्रकच्या धडकेत 15 वर्षीय मुलीचा मृत्यू..

87

निगडी, दि. १६ (पीसीबी) – मावशीसोबत रस्त्याने जात असलेल्या 15 वर्षीय मुलीला भरधाव ट्रकने धडक दिली. त्यात मुलीचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. 15) सकाळी साडेअकरा वाजता निगडी गावठाण येथील एसबीआय बँकेच्या समोर घडला.तन्वी विनोद गव्हाणे (वय 15, रा. भोसरी) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी जयश्री तुकाराम काळभोर (वय 49, रा. निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक (एम एच 04 / बी जी 7463) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांच्या बहिणीची मुलगी तन्वी गव्हाणे आणि भावाची मुलगी आर्या काळे अशा तिघीजणी रविवारी सकाळी साडेअकरा वाजता निगडी गावठाण येथील एसबीआय बँकेसमोरून चालत जात होत्या. पवळे ब्रीजकडून भक्ती शक्ती चौकाकडे जात असलेल्या एका भरधाव वेगातील ट्रकने तन्वीला धडक दिली. ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडली गेल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यातच तिचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक अपघाताच्या ठिकाणी न थांबता निघून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.