निगडी येथे “एक गाव एक शिवजयंती” उत्साहात साजरी

288
निगडी, दि.१३ (पीसीबी) – अखिल साईनाथ नगर, निगडी येथे “एक गाव एक शिवजयंती” नुकतीच साजरी करण्यात आली. यामध्ये साईनाथ नगर मधील सर्व सोसायटी आणि  गणेश मंडळांनी सहभाग घेतला.
या संपूर्ण परिसरात शिवजयंती निमित्त विविध उपक्रम घेण्यात आले, ज्यामध्ये  गडकिल्लांचे छायाचित्र प्रदर्शन, जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले आणि परिसरातील नागरिकांना महाप्रसाद ठेवण्यात आला होता.

सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. महिला शिवव्याख्याती च्या ओघवत्या वाणीने आणि महाशिववंदनेने महाराजांच्या पराक्रमाला उजाळा देत शोभायात्रेची सुरवात, अंकुश चौक निगडी येथून करण्यात आली.  प्रभागातील लहान मुलींनी शिवाजी महाराज याचा पाळणा गाऊन जन्मोत्सव साजरा केला.

शोभायात्रेची सांगता जगदाळे टॉवर्स येथे करण्यात आली. विविध मंडळांनी शोभायात्रेचे स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीने आणि नागरिकांना सरबत,पाणी वाटपाने केले. शोभायात्रेमध्ये ढोल, ताशे व शौर्य वाद्य वाजवण्यात आले. सर्व शिवभक्त पारंपरिक वेशात डोक्यावर भगवी टोपी, फेटे व खांद्यावर उपरणे परिधान करून सहभागी झाले. शोभायात्रेच्या मार्गावर रांगोळ्यांची रास काढण्यात आली व  प्रत्येक चौकात फुलांची उधळण करण्यात आली. महिला व तरुणींनी भगवे फेटे परिधान करून फुगड्यांचे फेर धरत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे आयोजन अखिल साईनाथ नगर मधील सर्व  सोसायटी, गणेश मंडळे, प्रतिष्ठान, आजी व माजी नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गट, भजनी मंडळे, व्यापारी वर्ग, शिक्षण संस्था व विविध क्षेत्रातील सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी केले.
साईनाथ नगर  परिसरामध्ये एक गाव एक शिवजयंती माध्यमातून निघालेल्या शोभायात्रेची शिस्त व आयोजन पाहून परिसरातील नागरिक व व्यापारी आयोजकांचे कौतुक करत होते.

 

WhatsAppShare