निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यानातील राष्ट्रध्वज खरेदी प्रकिया निविदा पद्धतीने राबवण्याची मागणी  

225

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यानामध्ये उभारण्यात आलेला देशातील सर्वात उंच (१०७ मिटर) राष्ट्रध्वज स्तंभ असून वाऱ्याच्या वेगाने राष्ट्रध्वज फाटत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने राष्ट्रध्वजाची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला असून हा राष्ट्रध्वज खरेदी प्रक्रिया निविदा पद्धतीने राबविण्यात यावी, अशी मागणी सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यानामध्ये देशातील सर्वात उंच (१०७ मिटर) राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात आला. परंतू, आतापर्यंत २०–२२ वेळा मागणी करून सुद्धा राष्ट्रध्वज कायमस्वरुपी महापालिका प्रशासनाने फडकवला नाही. कारण राष्ट्रध्वज १२० फुट बाय ८० फूट आकाराचा असून त्याचे वजन ८० किले पर्यंत आहे. त्यामुळे वाऱ्याच्या वेगाने राष्ट्रध्वज फाटत आहे.

त्यामुळे महापालिका प्रशासनाने राष्ट्रध्वज ९० फुट बाय ६० फुट अशा आकाराचा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा राष्ट्रध्वज खरेदी करताना निविद पद्धतीने खरेदी करावा. जेणेकरून राष्ट्रध्वज खरेदी प्रक्रिया संदर्भात आर्थिक घोटाळा होणार नाही, असे त्यांनी दिलेल्या म्हटले आहे.