निगडी प्राधिकरणातील ज्येष्ठ डॉक्टराची आठ लाखांची फसवणूक

311

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – वडिलांच्या नावे असलेली प्रॉव्हीडंट फंडची ३ लाख १० हजार ९९० रुपयांची रक्कम जमा असल्याचे खोटे सांगून आयटी निरीक्षकाने त्याच्या साथीदारांसोबत मिळून एका ज्येष्ठ डॉक्टरची तब्बल ७ लाख ९० हजार ४७ रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार एप्रिल २०१८ ते ९ ऑगस्ट २०१८ दरम्यान निगडी येथे घडला.

डॉ. विकास सीताकांत साळस्तेकर (वय ६१, रा. पालवी बंगला, सेक्टर २७, प्लॉट नंबर २३२, प्राधिकरण) असे फसवणूक झालेल्या ज्येष्ठ डॉक्टराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्नेहा सिंग, रूपा तोमर, राजू वर्मा, सुनील गोयल, झा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात आर्थीक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्नेहा आणि रूपा यांनी एप्रिल २०१८ मध्ये डॉ. विकास यांच्या वडिलांच्या नावावर असलेले प्रॉव्हिडंट फंडचे ३ लाख १० हजार ९९० रुपये त्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे सांगितले. मात्र ही रक्कम काढण्यासाठी वेगवेगळ्या कारणांसाठी पैशांची मागणी केली. डॉ. विकास यांनी स्नेहा आणि रूपा यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँकेच्या खात्यावर ४ लाख ७९ हजार ५७ रुपये एनईएफटीद्वारे जमा केले. मात्र त्यांना प्रॉव्हिडंट फंडची रक्कम परत मिळाली नाही. यातून डॉ. विकास यांची तब्बल ७ लाख ९० हजार ४७ रुपयांची फसवणूक झाली. यावरून निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक एस.व्ही.आवताडे तपास करत आहेत.

दरम्यान आरोपी स्नेहा आणि रूपा या आयटी इन्स्पेक्टर आहेत. तर राजू आणि सुनील आयटी ऑफिसर असल्याचे समजते.