निगडीत सराफाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून चोरट्यांनी सोन्याचे मणी पळवले

35

निगडी, दि. २५ (पीसीबी) – दुचाकीवरुन वडिलांसोबत घरी निघालेल्या एका सराफ व्यावसायीकाच्या आणि त्याच्या वडिलांच्या डोळ्यात मिरडीपूड टाकूण त्यांच्या जवळील सोन्याचे मणी असलेली बॅग तिघा चोरट्यांनी जबरदस्तीने हिस्का मारुन चोरुन नेली आहे. ही घटना निगडी येथील थरमॅक्स चौकात रविवारी (दि.२४) रात्री नऊच्या सुमारास घडली.

याप्रकरणी मयुर मफतलाल सोनी (वय १९, रा. आकुर्डी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात दुचाकीवरील अज्ञात तीन चोरट्यांविरुध्द फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयुर याचे आकुर्डी येथे कस्तुरी मार्केटमध्ये सोन्याचे दुकान आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास तो दुकान बंद करुन दुचाकीवरुन आपल्या वडिलांसोबत घरी निघाला होता. यावेळी त्यांच्या जवळ २९ हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम सोन्याचे मणी असलेली एक बॅग होती. त्यांची दुचाकी थरमॅक्स चौकात आली असता मागून एका दुचाकीवरुन आलेल्या तिघा चोरट्यांनी मयुर आणि त्याच्या वडिलांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून, त्यांच्या जवळील सोन्याचे मणी असलेली बॅग जबरदस्तीने हिस्कावून नेली. यावर सोनी यांनी तातडीने निगडी पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगून तक्रार दाखल केली. निगडी पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.