निगडीत माल वाहतूकदारांचा चक्काजाम; विद्यार्थी वाहतूक बंद

93

पिंपरी, दि. २० (पीसीबी) –  पेट्रोल, डिझेलची दरवाढ, टोलसह विविध मागण्यांसाठी स्कूल बस अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशन आणि  ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने आज (शुक्रवार) देशभरात एकदिवसीय संपाची हाक दिली आहे. त्यामुळे पिंपरी- चिंचवड शहरातील शाळांची विद्यार्थी वाहतूक बंद राहिली. तर निगडीतील ट्रान्सपोर्टनगरमध्ये मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी चक्काजाम करून संपात सहभाग नोंदवला.       

या संपात सर्व खासगी वाहतूकदारांनी सहभाग घेतला आहे. या बंदमध्ये स्कूल बस, खासगी बससह खासगी कॅब, ट्रक, टेम्पो या वाहनचालकांनी सहभाग घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आपापल्या जबाबदारीवर बस सुरू ठेवाव्यात, असे असोसिएशनने म्हटले आहे. तर स्कूल बसचालकांनी संपात सहभाग घेतल्यांनी विद्यार्थ्यांनी आज घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे शहरातील शाळामध्ये शुकशुकाट जाणवत होता.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जीएसटीअतंर्गत आणाव्यात, इंधनाचे दर सहा महिन्यातून एकदा निश्चित करावेत, मुंबईतल्या सर्व टोल नाक्यांवर टोलमाफी द्यावी, राज्यातील सर्व टोलनाक्यांवर स्कूल बसचा प्रवास मोफत करावा, आरटीओऐवजी वार्षिक वाहन तपासणी स्कूल बस सेफ्टी समितीने करावी, शाळेभोवती पार्किंगला जागा मिळावी, खड्डेमुक्त रस्ते आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.