निगडीत महाकाली टोळीतील सराईताकडून दोन पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त

929

निगडी, दि. ५ (पीसीबी) – बेकायदेशीररित्या दोन गावठी पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी महाकाली टोळीतील एका सराईताला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई निगडी ट्रान्सपोर्टनगर येथे करण्यात आली.

साजन मन्नु मेहरा (वय २५, रा. महात्मा गांधी शाळेजवळ, देहूरोड) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथे पीएमपीच्या भिंतीजवळ एक सराईत आरोपी संशयितरित्या थांबला असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली होती. यावर निगडी पोलिसांच्या तपास पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून साजन या सराईत आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला चार जिवंत काडतुसे भरललेली एक लोंडेड गावठी पिस्टल आढळली. पोलिसांनी ती ताब्यात घेऊन साजन याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडे आणखी एक पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि एक मोकळी मॅगझीन असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी अशा प्रकारे दोन गावठी पिस्टल, सहा जिवंत काडतुसे आणि एक मोकळी मॅगझीन साजनकडून जप्त केली आहे.

दरम्यान साजन हा महाकाली टोळीतील रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, पिस्टल बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.