निगडीत पार्किंगच्या वादातून कान चावून तोडला लचका

106

निगडी, दि. १० (पीसीबी) – पार्किंगच्या कारणावरून झालेल्या भांडणातून एकाने पती-पत्नीला लोखंडी टॉमीने मारहाण केली. तसेच पतीच्या कानाचा चावा घेत लचका तोडला. ही घटना सोमवारी (दि. ८) रात्री साडेअकराच्या सुमारास यमुनानगर, निगडी येथे घडली.

याप्रकरणी जखमी कौतुभ महेंद्र गोळे (वय २६, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिजित गुंजाळ (रा. यमुनानगर, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री कौतुभ यांनी त्यांची दुचाकी ते राहत असलेल्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपी अभिजित कौतुभ यांच्या दुचाकीजवळ बसून काहीतरी खोडसाळपणा करीत असल्याचे कौतुभ यांची पत्नी सुषमा यांच्या लक्षात आले. त्यांनी कौतुभ यांना ही बाब सांगितली. यावर कौतुभ पार्किंगमध्ये गेला असता अभिजितने त्यांच्या दुचाकीला लाथ मारून खाली पाडले. त्यानंतर कौतुभने त्याला याचा जाब विचारला असता अभिजित याने ‘त्याची कार पार्क करण्यासाठी कौतुभ यांच्या दुचाकीमुळे अडचण येत आहे’ असे म्हणत कौतुभ आणि त्यांच्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी टॉमी मारली. तसेच कौतुभ यांच्या उजव्या कानाला जोरात चावा घेतला. यामुळे कौतुभ यांच्या कानाचा तुकडा पडला. अभिजित याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. निगडी पोलिस तपास करत आहेत.