निगडीत ‘त्या मुलीसोबत फिरु नको’ धमकी देवून दोघा भावांना तिघांनी जबर मारहाण करुन दिली जीवेमारण्याची धमकी

1238

निगडी, दि. २१ (पीसीबी) – तु त्या पोरीसोबत फिरु नको अशी धमकी देवून तिघा टोळक्यांनी दोघा मावस भावांना चाकू, दगड आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले आहे. ही घटना शनिवारी (दि.१८) साडेआठ ते नऊच्या दरम्यान निगडी रुणीनगर येथील घारजाई मंदिराजवळ घडली.

वैभव गायकवाड (वय १४) आणि गणेश लक्ष्मण आडसुळे (वय १९, दोघेही रा. अष्टविनायक दुकानासमोर सहयोग हौसींग सोसायटी, सहयोगनगर रुपीनगर, निगडी) असे मारहाण होऊन गंभीर जखमी झालेल्या दोघा मावस भावांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास चौधरी, अदनान सय्यद, फैय्याज शेख (तिघेही रा. ओटास्किम, निगडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेआठच्या सुमारास आरोपी विकास आणि अदनान या दोघांनी वैभव याला अडवून ‘तू त्या पोरीसोबत फिरु नको’ अशी धमकी देत त्याला लाकडी काठीने आणि लाथा बुक्यांनी जबर मारहाण केली. हे पाहून जवळ उभे असलेल्या वैभवचा मावस भाऊ गणेश भांडणे सोडवण्यासाठी मधी आला. त्याने भांडणे सोडवून वैभवला घरी सोडले. मात्र त्याच दरम्यान आरोपी विकास, फैय्याज आणि अदनान या तिघांनी गणेशवर हल्ला केला. अदनानने गणेशच्या पाठीत चाकूने वार केला, फैय्याजने त्याच्या डोक्यात दगड मारला तर विकासने त्याला काठीने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले आणि फरार झाले. घटनेची माहिती मिळताच गणेशचे नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. उपचार घेत असताना आरोपी विकास चौधरी आणि अदनान सय्यद या दोघांनी रुग्णालयात घूसून गणेशला पोलिसात तक्रार करु नकोस असे सांगून जीवेठार मारण्याची धमकी दिली. निगडी पोलिस तपास करत आहेत.