निगडीत गळ्याला फास लावतानाचा सेल्फी काढून तरुणाची आत्महत्या

134

निगडीतील एका कंपनीत कामाला असलेल्या तरुणाने जगण्याचा कंटाळा आला म्हणून चक्क गळ्याला फास लावतानाचा सेल्फी काढून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.८) रात्री उशीरा सुमारास समोर आली.

विनोद रमेश गोसावी (वय १९, रा. रुपीनगर, निगडी, मूळ रा. शहादा, नंदुरबार) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयद विनोद हा त्याच्या भावासोबत निगडीतील रुपीनगर येथे राहत होता. तसेच ते दोघेही चिंचवडमधील एका कंपनीमध्ये एकत्र कामाला होते. शनिवारी (दि.७) सकाळी दोघेही एकत्र कामावर गेले. पहिली शिफ्ट संपल्यानंतर विनोद दुपारच्या सुमारास घरी आला. मात्र त्याच्या भावाला दुसऱ्या शिफ्टला कंपनीतच थांबावे लागले. रात्री दुसरी शिफ्ट संपल्यानंतर भाऊ घरी आला. तेव्हा त्याने बराच वेळ घराचा दरवाजा वाजवला. पण आतमधून कोणताही प्रतिसाद न आल्याने विनोदच्या भावाने घराचा दरवाजा तोडला. तेव्हा आतमध्ये विनोदने चादरीचे कडे कापून त्याच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. धक्कादायक म्हणजे कंपनीमध्ये मोबाईल फोन वापरण्यास बंदी आहे. त्यामुळे विनोदच्या भावाने आपला मोबाईल फोन घरीच ठेवला होता. त्या मोबाईलमध्ये विनोदने गळ्याला गळफास लावून सेल्फी काढला. तसेच त्याने एक चिट्ठी लिहून ठेवली. त्यामध्ये  ‘जीवनाचा कंटाळा आला आहे, म्हणून आत्महत्या करीत असल्याचे’ म्हटले आहे. पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.