निगडीत खासदार प्रीतम मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या शिक्षकाला बेदम मारहाण

2159

निगडी, दि. ९ (पीसीबी) – बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याने त्यांच्या समर्थकांनी एका शिक्षकाला फेसबुक लाईव्ह करुन बेदम मारहाण केली. ही घटना आज (रविवार) दुपारच्या सुमारास निगडी येथील निवेदिता बँकेसमोर घडली.

संजय कुऱ्हाडे असे मारहाण करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गणेश कराडसह पाच ते सहा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय कुऱ्हाडे हे कॅम्प एज्युकेशनमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. महिलांविषयी बेताल वक्तव्य करणारे भाजपचे आमदार राम कदमांच्या वक्तव्यावरून संजय कुऱ्हाडे यांनी ‘प्रीतम मुंडे’ देखील अविवाहित असल्याची टिप्पणी सोशल मीडियावर केली होती. याच कारणावरुन आज दुपारी गणेश आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कुऱ्हाडेंना निगडी येथील निवेदिता बँकेसमोर बोलावून घेतले. तसेच फेसबुक लाईव्ह सुरू करुन आधी पोस्ट केलेल्या वक्तव्याची माफी मागायला लावली आणि मग शिवीगाळ करत मारहाणही केली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी मारहाण आणि अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.