निगडीत अवघ्या चारशे रुपयांसाठी ‘त्या’ दोघांचा खून करून मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी फेकले

2054

भोसरी, दि. २८ (पीसीबी) – उसने दिलेले पैसे परत करण्यावरून झालेल्या भांडणातून मित्रांनीच मित्राचा आणि त्याच्या मैत्रिणीचा खून करून मृतदेह फेकून दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा गुन्हा निगडी पोलिसांनी उघडकीस आणून तिघांना अटक केली आहे.

सोनाली वाकडे उर्फ मॅक्स (वय २५, रा. निगडी) आणि सलमान शब्बीर शेख (वय २०, रा. देहूरोड) असे खून झालेल्यांचे नावे आहेत. तर रवी मानसिंग वाल्मिकी (वय ३२, रा. देहूरोड), नागेश शिलामन चव्हाण (वय २३, रा. आकुर्डी) आणि विशाल महिंद्र वाल्मिकी (वय २५, रा. देहूरोड) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर सचिन चव्हाण आणि प्रशांत साळवी हे दोघे पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली ही निगडी ओटास्किम येथून बेपत्ता झाली होती. सोनालीच्या भावाने घातपाताची शक्यता वर्तवली होती. गुरूवारी (दि. १९) रात्री आठच्या सुमारास सोनलीला तिचा एक मित्र भेटण्यास घरी आला होता. त्यानंतर ती बाहेर गेली त्या दिवशी सोनाली रात्रभर घरी आली नाही. तेव्हा भावाने देहूरोड येथील तिच्या मित्राकडे चौकशी केली असता त्या मित्राने सांगितले की, तिच्या दुसऱ्या तीन मित्रासह ती महिला देहूरोड येथून गेली आहे. सोनालीच्या भावाने त्या मित्रांचा शोध घेतला मात्र, तोही मिळाला नाही.

दरम्यान, त्याने पोलिासांकडे तक्रार केली. निगडी पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर त्या दिवशी दारू प्यायला एकत्र असणारे मित्र सापडले. त्याच्याकडे पोलिसांनी कसून तपास केला असता त्यांनी खून केल्याची कबूली दिली.

सलमान याने मित्र रवी वाल्मिकी याच्या मित्राला ५०० रुपये उसने दिले होते. त्यातील फक्त १०० रुपये त्या मित्राने सलमान याला परत केले होते. यावरून दोन वेळा सलमान आणि रवी यांच्यात भांडण झाले होते. दरम्यान, हे सर्वजण एकत्र दारू प्यायला आले. त्यावेळी बाजूला गेलीली मॅक्स तेथे आली. तिने आरडा ओरडा केला. सलमानला सोडा असे म्हणाली, त्यामुळे तिचाही खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. पुरावा नष्ट करण्यासाठी मॅक्सचा मृतदेह नदीत तर सलमानचा सांगवडे गावच्या हद्दीत टाकून आरोपी पसार झाले होते. निगडी पोलिस तपास करत आहेत.