निगडीत अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी

579

निगडी, दि. २ (पीसीबी) – दुचाकीवरुन मित्रासोबत जात असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीवर मागे बसलेला त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि.१) रात्री उशीरा दीडच्या सुमारा आकुर्डीतील जी.पी.आर.ए क्वाटर्स आय बिल्डींग लगतच्या संरक्षण भिंतीजवळ घडली.

जितेंद्र चौधरी (वय ३०, रा. डिव्हड्रॉप सोसायटी, ई विंग, फ्लॅट नं.२०१) असे मयत दुचाकीचालवणाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ अशोक बारीकराव चौधरी (वय ३६, डिव्हड्रॉप सोसायटी, ई विंग, फ्लॅट नं.२०१) याने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक यांचा भाऊ जितेंद्र हा शनिवारी रात्री उशीरा दीडच्या सुमारास त्याचा बिजलीनगर येथील मित्र उस्मान बागवान याला घेऊन दुचाकी (क्र.एमएचय/१४/बीयु/५०८४) यावरुन ट्रान्सपोर्टनगर निगडी येथून चिंचवड येथील गुरुव्दाऱ्याकडे जात होता. यावेळी एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. याध्ये जितेंद्र याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. तर उस्मान याचा हात फ्रॅक्चर होऊन गंभीर जखमी झाला. निगडी पोलिस आरोपी वाहन चालकाचा शोध घेत आहेत.