निगडीतील सर्वात उंचावरील राष्ट्रध्वज फाटला; महापालिकेवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोरांची मागणी

897

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्प समूह परिसरात सर्वात उंच ध्वजस्तंभ उभारला आहे. या ध्वजस्तंभावर फडकवण्यात आलेले राष्ट्रध्वज फाटला आहे. त्याबाबत महापालिकेकडे तक्रार केली असताना प्रशासन कोणतीही दखल घेत नाही. त्यामुळे निगडी येथील सचिन काळभोर यांनी राज्य सरकारच्या आपले सरकार पोर्टलवर तक्रार करून राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी महापालिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सचिन काळभोर यांनी आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या तक्रारी म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड महापालिकेने निगडीतील भक्ती-शक्ती शिल्प समूह परिसरात १०७ मीटर उंचीचा ध्वजस्तंभ उभारला आहे. सुमारे साडेतीन कोटी रुपयांहून अधिक खर्च करून उभारण्यात आलेल्या या ध्वजस्तंभावर २६ जानेवारी २०१८ रोजी राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. एकदा राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर महापालिकेने त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. या ध्वजस्तंभावरून राष्ट्रध्वज आजपर्यंत अनेकदा खाली आला आहे. तसेच राष्ट्रध्वजाची शिलाई उसवली असून, हवेच्या दाबाने कापड फाटले आहे. याप्रकरणी महापालिकेवर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्याची आपण निगडी पोलिसांकडे लेखी मागणी केली होती. परंतु, पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आपण याप्रकरणाची दखल घेऊन राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.”