निगडीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास तीन पिस्तुल आणि दहा काडतुसांसह अटक

625

पुणे, दि. ३० (पीसीबी) – निगडीतील एक सराईत गुन्हेगार वारजे माळवाडी येथील हॉटेल आम्रपाली जवळ गावठी पिस्तुल विक्री करण्यास गेला असता वारजे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तीन गावठी पिस्तुल आणि दहा काडतुसे असा एकूण एक लाख सहा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

निळकंठ सुर्यकांत राऊत (वय ३८, रा. भैरवनाथ हाऊसिंग सोसायटी रूपी नगर, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस नाईक आशिष बोटके यांना त्यांच्या खबऱ्या मार्फत बातमी मिळाली की, वारजे माळवाडी येथील महामार्गालगत असलेल्या हॉटेल आम्रपाली जवळ एकजण गावठी पिस्तुल विक्रीसाठी घेवून येणार आहे. पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून नीलकंठ राऊत याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ तीन देशी बनावटीचे गावठी पिस्तुल आणि दहा जिवंत काडतूसे आढळून आली. पोलिसांनी त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३० जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. राऊत हा शहर पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापुर्वी घरफोडी, हत्यार बाळगणे, जबरी चोरी, वाहन चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.