निगडीतील रिक्षाचालकाचे अपहरण करुन जीवे मारण्याची धमकी

132

निगडी, दि. १४ (पीसीबी) – पैशांच्या देवाण घेवाणातून एका रिक्षाचालकाचे अपहरण करुन त्याला डांबून ठेवत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवार (दि.१२) ते शनिवार (दि.१३) सायंकाळी बाराच्या दरम्यान देहुगाव येथे घडली.

सद्दाम नाझर पटेल (वय ३०, रा. गजानन हौसिंग सोसायटी रुपीनगर, तळवडे) असे अपहरण करुन धमकवण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आकाश पाटोळे आणि त्यांच्या वडिलांविरोधात (नाव समजुशकले नाही) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सद्दाम हा रिक्षाचालक आहे. काही दिवसांपूर्वी त्याने आकाश याच्याकडून त्याच्या ओळखीच्या व्यक्तीस पैसे घेऊन दिले होते. मात्र तो व्यक्ती पैसे देत नल्याने शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास आरोपी आकाश याने सद्दाम याचे अपहरण करुन त्याला देहूगाव येथील एका हॉटेलात ठेवले. तेथे त्याने सद्दामला शुक्रवार आणि शनिवार हे दोन दिवस डांबून ठेवत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शनिवारी रात्री बाराच्या सुमारास त्याला सोडून दिले. याप्रकरणी सद्दाम याने आकाश आणि त्याच्या वडिलांविरोधात चिखळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे तपास करत आहेत.