निगडीतील भेळ चौक, मोशीतील स्पाइन रस्ता येथे गोविंदांचा थरथराट; अभिनेत्री स्मिता गोंदकर आणि स्नेहलता तावडेची हजेरी

364

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – ‘गोविंदा आला रे आला’ची ललकारी…डीजेचा धतडततड धतडततड दणदणाट…ढोल ताशांचा गजर आणि एकावर एक उंच मानवी मनोरे रचण्याची सुरू असलेली स्पर्धा…अशा जल्लोषपूर्ण वातावरणात जिजाई महिला प्रतिष्ठान आणि पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने निगडीतील भेळ चौकात तसेच भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांच्या वतीने मोशी, स्पाईन रोड येथे आयोजित दहीहंडी महोत्सव सोमवारी (दि. ३) मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

निगडीतील भेळ चौकात झालेल्या दहीहंडी उत्सवाला “पप्पी दे…पप्पी दे पारूला” फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर, कांचन गोसावी, अभिनेता पुष्कर जोग यांची विशेष उपस्थिती होती. अभिनेत्री स्मिता गोंदकर यांनी “पप्पी दे….पप्पी दे पारूला” या गाण्यावर ठेका धरून दहीहंडी उत्सवाला उपस्थित असलेल्या अबालवृद्धांना ठेका धरायला लावला. अभिनेता पुष्कर जोग यांनेही तरूणांना डोलायला लावले. मुंबईतील क्रांती गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी उपमहापौर शैलजा मोरे, जिजाई प्रतिष्ठानच्या संस्थापिका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेविका आशा धायगुडगे-शेंडगे, अनुराधा गोरखे, नगरसेवक शीतल शिंदे, माऊली थोरात, मनसेचे गटनेते सचिन चिखले राजेश पिल्ले, माजी नगरसेवक शंकर जगताप, आर. एस. कुमार, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर, सारिका पवार आदी उपस्थित होते.

मोशी, स्पाईन रस्ता येथे आयोजित दहीहंडी मुंबईतील दोस्ती गोविंदा पथकाने फोडली. यावेळी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील सोयराबाईफेम अभिनेत्री स्नेहलता तावडे हिने उपस्थितांची मने जिंकून घेतली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, आयोजक व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर, नगरसेविका आशा शेंडगे-धायगुडे, नम्रता लोंढे, योगेश लोंढे, युवा नेते समर कामतेकर आदी उपस्थित होते.