निगडीतील तरुणाला ५३ लाखांचा गंडा घालणाऱ्या महिलेला हैदराबादमधून अटक

963

निगडी, दि. ९ (पीसीबी) – लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे आमिष दाखून एका महिलेने तरुणासोबत व्हाट्सअपद्वारे ओळख करुन त्याला तब्बल ५३ लाख ६५ हजारांचा गंडा घातला होता. या महिलेला निगडी पोलिसांनी हैद्राबादमधून अटक केली असून तिच्यासोबत तिच्या पतीलाही अटक करण्यात आली आहे.

जहीर युसूफ शिकलगार (वय ३०, रा. सेक्‍टर नंबर २१, अरमान बिल्डिंग, यमुनानगर, निगडी) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने निगडी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्यानुसार प्रवलिका राजेश गौड (वय २४) आणि राजेश प्रभाकार गौड (वय २८, दोघे रा. हैद्राबाद, तेलंगणा) या दाम्पत्याला हैदराबाद येथून अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जहीर आणि प्रवलिका यांची वर्षभरापूर्वी व्हॉटसऍपद्वारे ओळख झाली होती. यावेळी तिने जहीर याला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे आमिष दाखवले. त्याचा विश्‍वास संपादन केला. काही दिवसांनी प्रवलिका हिने तिच्या वडिलांना कॅन्सर असल्याचे जहीर याला सांगितले. तसेच वेळोवेळी विविध माध्याद्वारे तब्बल ५३ लाख ६५ हजार रुपये जहीर कडून उकळले. तसेच ते पैसे परत करण्याचे देखील आश्वासन दिले होते. मात्र प्रवलिकाने बरेच दिवस उलटून देखील पैसे परत केले नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जहिरने निगडी पोलिसात तक्रार दाखल केली.

निगडी पोलिसांनी तातडीने मोबाईल क्रमांक आणि बॅंक खात्याच्या माहितीच्या आधारे हैदराबाद येथील आरोपी प्रवलिका आणि पती राजेश या दोघांना शोधून ताब्यात घेतले.  पोलिसांनी प्रवलिकाची कसून चौकशी केली असता, तिनेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच तिने या पैशातून कार, घर, दागिने, महागड्या वस्तू, महागडे मोबाईल खरेदी केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या गुन्ह्यात तिचा साथ देणारा तिचा पती राजेश यालाही अटक केली. तसेच दोघांकडून १० लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर अवताडे तपास करत आहेत.