निगडीतील काळभोरचौकात भरधाव ट्रकने पादचाऱ्यास चिरडले

470

निगडी, दि. २ (पीसीबी) – निगडीतील काळभोरचौकात एका भरधाव ट्रक चालकाने रस्ता ओलांडत असलेल्या ३० वर्षीय तरुणाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि.१) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली.

रामदास नेताजी शिंदे (वय ३०, रा. पीसीएमसी कॉलनी, बिल्डींग नं.५, ४ था मजला, निगडी) असे मयत पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ सागर नेताजी शिंदे (वय २२, रा. पीसीएमसी कॉलनी, बिल्डींग नं.५, ४ था मजला, निगडी) याने निगडी पोलिस ठाण्यात ट्रक चालका विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यानुसार ट्रक चालक गजेंद्र चंद्रभान उगलमुगले (रा. मामुर्डी देहूरोड, मुळ.रा. वाघोर बाभुळगाव, बिड) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रामदास हा शनिवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास निगडी काळभोर चौकातील रस्ता ओलांडत होता. यावेळी समोरुन आलेला भरधाव ट्रक (एमएच१२/केपी/९९९८) याने रामदास याला जोरदार धडक दिली. यामुळे रामदास ट्रकच्या डाव्या बाजूच्या चाका खाली आला आणि चिरडला गेला. या घटनेमध्ये त्याच्या छातीला, पाठीवर गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रक चालक गजेंद्र उगलमुगले याला अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.