नाशिक फाट्याजवळ देशी बनावटीच्या पिस्तुलासह तरुणाला अटक

163

भोसरी, दि. १० (पीसीबी) –  नाशिक फाट्याजवळ एका तरुणाला देशी बनावटीचे पिस्तुल आणि एका जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. ९) सायंकाळी पाचच्या सुमारास भोसरी पोलिसांनी केली.

रामभजन चानू रईकवार (वय २५, रा. नवी पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी भोसरी पोलिसांना एक तरुण नाशिक फाट्याजवळ पिस्तुल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. यावर भोसरी पोलिसांनी नाशिक फाट्याजवळ सापळा रचून रामभजन रईकवार या तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि एका जिवंत काडतुस जप्त केले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. भोसरी पोलिस अधिक तपास करत आहेत.