नाशिकफाटा, कासारवाडीत दोन दिवसांत अतिक्रमण कारवाई

221

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – नाशिकफाटा आणि कासारवाडी परिसरात गेल्या दोन वर्षांत उभे राहिलेल्या अनधिकृत पत्राशेडस तसेच बांधकामावर अतिक्रमण कारवाई होणार आहे. दोन दिवसांत पोलिस बंदोबस्तात कारवाई करणार असल्याचे महापालिकेतील प्रशासकिय सुत्रांनी सांगितले.

नाशिकफाटा उड्डाण पुलाच्या खाली रेल्वे मार्गाला समांतर महामार्गापर्यंत सर्व मोकळी जागा होता. त्या ठिकाणी पत्र्याचे मोठ मोठे शेडस् बांधण्यात आले. वाहनांचे सुटे भाग, रेस्टॉरंट, शोरुम, चहाचे दुकान, ट्रान्सपोर्टरचे कार्यालय अशी तब्बल २२ दुकाने त्या जागांवर उभी कऱण्यात आली. स्थानिक राजकिय मंडळींच्या आशिर्वादाने हे सर्व अतिक्रमण उभे आहे. त्यातून दरमहा लाखो रुपयांचे भाडे काही जमीनदलाल, राजकारणी लोक वसूल करतात. आता हे सगळे शेड्स काढून टाकण्याची नोटीस दिली आहे. १३ मे रोजी पोलिस बंदोबस्तात ही सर्व अतिक्रमणे काढून टाकण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या ह प्रभागातर्फे ध्वनीक्षेपकावर संबंधीत अतिक्रमण मालकांना सुचना कऱण्यात आली. स्वतःहून ही सर्व अतिक्रमणे काढून घ्या अन्यथा महापालिका कारवाई कऱणार आहे, अशी सुचना देण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ आहे.महापालिकेचे प्रभाग अधिकारी विजय थोरात यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, १३ किंवा १४ नंतर आम्ही कारवाई कऱणार आहोत. २२ ते २५ पत्रा शेडस् बांधण्यात आली आहेत, ती पाडणार आहोत.