नाशिकचे प्रश्न सुटणार असतील, तर खुशाल माझी बदली करा – तुकाराम मुंढे

222

नाशिक, दि. २८ (पीसीबी) – माझी बदली करून जर नाशिकचे प्रश्न सुटणार असतील, तर खुशाल माझी बदली करावी, अशी प्रतिक्रिया नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. महापालिकेत सत्ताधारी भाजपने मुंढे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यावर मुंढे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंढे यांनी महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावत तो पारदर्शक करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अनावश्यक खर्चाला पायबंद घालून सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराला आळा घातला आहे. यावर भाजपसह सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली होती. त्यामुळे मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची खेळी सत्ताधारी भाजपने खेळली.

या पार्श्वभूमीवर मुंढे म्हणाले की, माझ्यावर केलेले आरोप निराधार असून करवाढीबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. महापालिकेतील २२ ते २३ गावांमध्ये मातीचे रस्ते असतानाच दुसरीकडे शहरातील रस्त्यांवर कोट्यवधीचा खर्च होतो. हा खर्च कशामुळे होतो, असा सवालही त्यांनी विचारला. वारंवार बदली होत असल्याने वाईट वाटते. परंतु निर्णय शेवटी सरकारचा असतो, अशी उद्विग्नता मुंढे यांनी व्यक्त केली.