नालासोपाऱ्यात सनातन संस्थेच्या साधकाकडून आठ गावठी बॉम्ब जप्त

325

मुंबई, दि. १० (पीसीबी) – नालासोपाऱ्यातील भांडारआळी येथील एका घरातून दहशतवादविरोधी पथकाने मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा व आठ गावठी बॉम्ब जप्त केले आहेत. या प्रकरणी वैभव राऊत याला अटक करण्यात आली असून तो सनातन संस्थेचा साधक असल्याचा संशय आहे. ‘सनातन’ने मात्र वैभव हा आमचा साधक नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपासून एटीएसचे पथक वैभवच्या मागावर होते. पुरेशी माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात वैभवच्या घरातून व दुकानातून जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांमध्ये गन पावडर, डिटोनेटरचा समावेश आहे. हे सगळे साहित्य बॉम्ब बनविण्यासाठी वापरले जाते. किमान दोन डझन बॉम्ब बनवता येतील इतकी सामुग्री वैभवच्या घरातून मिळाले आहे.  ही स्फोटके वैभवने घरात का ठेवली होती?, ती कुठून आणली होती? त्याचा कसा वापर केला जाणार होता?, या सगळ्याची चौकशी आता पोलिसांनी सुरू केली आहे. त्याला आज भोईवाडा न्यायालयात हजर केले जाणार आहे.