नालासोपाऱ्यातील वैभव राऊतच्या घरातून आणखी शस्त्रसाठा जप्त

647

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकेप्रकरणी तिघांना अटक केल्यानंतर एटीएसने शनिवारी छापा टाकून आणखी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. दरम्यान, एटीएसने शनिवारी राज्यभर १६ जणांची कसून चौकशी केली. यातील काहींना चौकशीनंतर सोडून देण्यात आले होते.

शुक्रवारी नालासोपाऱ्यातून गोवंश रक्षा समिती व हिंदू जनजागृती समितीशी संबंधित वैभव राऊत याला तर वसईतून शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएसने राज्यभर विविध १६ जणांची कसून चौकशी केली. सूत्रांनुसार, एटीएसने वैभव राऊत याच्या निवासस्थानातून शनिवारी आणखी शस्त्रसाठा जप्त केला.

त्यामध्ये ११ गावठी पिस्तुले, मॅगझिन्स, १ गावठी कट्टा, १ एअरगन, १० पिस्तूल बॅरल, ६ अर्धवट तयार पिस्तूल बॉडी, ६ पिस्तूल मॅगझिन, ३ अर्धवट मॅगझिन, ७ अर्धवट पिस्तूल स्लाइड, १६ रिले स्वीच, १ ट्रिझर मॅगझिन, अर्धवट तयार शस्त्राचे सुटे भाग धाडीत सापडले आहेत. त्याशिवाय १ चॉपर, १ स्टील चाकू, वाहनांच्या ६ नंबर प्लेट, हँडग्लोव्हज, बॉम्बनिर्मितीची माहिती असलेली पुस्तके, पेनड्राइव्ह, हँडबुक, अनेक हार्डडिक्स आदी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. हे साहित्य आयईडी निर्मितीसाठीचे असल्याचा संशय तपास संस्थांना आहे.