नारायण राणे यांच्या पत्नी नीलम आणि आमदार नितेश राणे यांना पोलिसांकडून लूक आउट नोटीस

209

पुणे, दि. ९ (पीसीबी) – ‘डीएचएफएल’ कर्ज प्रकरणी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांना पुणे पोलिसांकडून लूक आउट नोटीस जारी करण्यात आली. कंपनीकडून घेतलेलं ६५ कोटींचं कर्ज थकवल्याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने ही नोटीस पाठवली आहे.

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने तक्रार नोंदवली होती. आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने २५ कोटींचं कर्ज घेतलं होतं. तर नीलम राणे या आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडच्या सहअर्जदार होत्या. या कर्जाची परतफेड न केल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती.

याचबरोबर नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने डीएचएफएल कडून ४० कोटींचं कर्ज घेतलं होतं. या कर्जाची परतफेड न झाल्याने डीएचएफएल संबंधित एजन्सीकडे याप्रकरणी तक्रार केली होती. पुणे पोलिसांनी ही लुक आउट नोटीस जारी केलेली आहे.

३ सप्टेंबर रोजी ही लुकआउट नोटीस पाठवली गेली आहे. हे पत्र छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाला देखील प्राप्त झालेलं आहे. मात्र, लुकआट नोटीस जारी होणं म्हणजे आरोपी आहे असं होत नाही. तरी देखील या लुकआउट नोटीसवर आता राणे कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

WhatsAppShare