नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाचा गुरूवारी मुंबईत मेळावा

58

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते व खासदार नारायण राणे यांची तोफ मुंबईत धडाडणार आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’वरील भेटीच्या पार्श्वभूमीवर राणे काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

गुरूवारी (दि.७) संध्याकाळी ६ वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात नारायण राणे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर राणेंनी कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकण येथे सभा घेतल्या आहेत. त्यानंतर मुंबईत पहिल्यांदाच कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या मेळाव्यातून शक्तीप्रदर्शन करणार आहे.