नाना पटोलेंनी पक्ष सोडला म्हणून आशीर्वाद संपत नाही – नितीन गडकरी

84

नागपूर,  दि. १४ (पीसीबी) – नाना पटोले यांनी पक्ष सोडला म्हणून आशीर्वाद संपत नाही. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात बोलताना दिली. नागपूरमध्ये पाच वर्षात काम केले आहे, त्याच्या आधारावर लोकांसमोर जाऊन मत मागणार आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.

काँग्रेसने लोकसभेच्या २१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. त्यात नाना पटोले यांना गडकरी यांच्याविरोधात  नागपूरमधून उमेदवारी दिली आहे.

याबाबत गडकरी म्हणाले की,  सगळ्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. मग कोणीही उमेदवार असेल. मी कोणावरही वैयक्तिक टीका-टिप्पणी करणार नाही. काँग्रेसला आपला उमेदवार ठरवण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे. जो उमेदवार असेल त्याने लढावे.   नाना पटोले यांनी पक्ष सोडला म्हणून आशीर्वाद संपत नाही. मी राजकारणात अशी दुश्मनी ठेवली नाही आणि ठेवतही नाही. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.