नाना पटोलेंचे ते वक्तव्य भयंकर – प्रवीण दरेकर..

56

 मुंबई, दि. १७ (पीसीबी) : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे वादळ निर्माण झाले आहे. ‘मी मोदींना मारु शकतो, शिव्याही देऊ शकतो’, अशा आशयाचे वक्तव्य करतानाचा नाना पटोले यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडिओवर काँग्रेसकडून अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. हा व्हीडिओ खरा आहे किंवा खोटा, याबाबत अद्याप पुष्टी झाली नसली तरी त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नाना पटोले यांना लक्ष्य केले आहे. नाना पटोले यांचे मोदींविषयीचे वक्तव्य भयंकर आहे. याप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.

मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो, नाना पटोले यांचं आक्षेपार्ह वक्तव्य

राजकारणात आपण एखाद्याला बोलू शकतो इथपर्यंत ठीक आहे. पण कोणाला मारु शकतो, हे वक्तव्य गंभीर आहे. नाना पटोले यांनी खरंच हे वक्तव्य केले असेल तर हा प्रकार दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अशी वक्तव्ये करत आहेत. सध्या काँग्रेसला देशभरात यश मिळत नसले तरी हा वैभवशाली परंपरा असलेला पक्ष आहे. पण नाना पटोले यांनी बालिशपणा मांडला आहे. देशाचा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री हे एका पक्षाचे नसतात, संपूर्ण देशाचे असतात. त्यामुळे त्यांच्याकडे राजकारण आणि तिरस्काराच्या दृष्टीकोनातून बघणे योग्य नसते. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांचे वक्तव्य वैयक्तिक नव्हे तर पक्षाचे वक्तव्य ठरते. यानिमित्ताने काँग्रेसच्या पोटातील खदखद बाहेर आली आहे का, याचा विचार झाला पाहिजे. भाजप याला योग्य प्रत्युत्तर देईल. याप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.