नातू, पणतू, खापर पणतू, सुना सगळेच पळवा; जागा तरी रिकामी होईल – जितेंद्र आव्हाड

106

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – नातू, पणतू, खापर पणतू, सुना सगळेच पळवा. त्यामुळे किमान येथील जागा तरी खाली होईल. पळून जाणारे सगळे तुम्हालाच लखलाभ असो. तसेही पळत आहेत ती श्रीमंताची पोरं आहेत, ही पोरं पळाली तरच गरिबांच्या पोरांना, आमच्यासारख्यांना संधी मिळेल, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार  जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

आता मुलंच नाही, तर नातवंडही पळवू, असा इशाराच गिरीश महाजन यांनी दिला होता. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी  पलटवार केला आहे.  सामनाच्या अग्रलेखातून भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये, असे  शिवसेनेने म्हटले आहे. त्यावर बोलताना पाळण्याची दोरीच तुमच्या हाती आहे, तुम्हीच ठरवा काय करायचे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.  यावर आव्हाड म्हणाले की, बाळासाहेब विखेंसोबत झालेला जुना वाद हा वैचारिकच होता. त्यावेळी राजीव गांधींनी बाळासाहेब विखेंना पाडा, असा आदेश दिला होता. ती जबाबदारी केवळ काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून शरद पवारांनी पाळली.