नातू द्या, नाहितर ५ कोटी भरा …

247

डेहराडून, दि. १२ (पीसीबी) : उत्तराखंडमधील हरिद्वारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भेलचे सेवानिवृत्त अधिकारी आणि त्यांच्या पत्नीने त्यांचा मुलगा आणि सून यांच्यावर खटला दाखल केला आहे. कारण लग्नाच्या 6 वर्षांनंतरही दोघांनाही मुले झाली नाहीत. एवढेच नाही तर आपल्या मुलाच्या संगोपन आणि शिक्षणावर खर्च केलेले नातवंडे किंवा 5 कोटी रुपये वर्षभरात देण्याची मागणी या वृद्ध दाम्पत्याने केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त भेल अधिकाऱ्याचा पायलट मुलगा गुवाहाटी येथे राहतो आणि सून नोएडा येथे काम करते. या जोडप्याचे वकील अरविंद श्रीवास्तव यांनी सांगितले की, मागितलेल्या ५ कोटी रुपयांमध्ये त्यांच्या मुलाचे पंचतारांकित हॉटेलमधील लग्न, ६० लाख रुपयांची आलिशान कार आणि परदेशात त्यांच्या हनीमूनवर खर्च करण्यात आलेला खर्च यांचा समावेश आहे. हरिद्वार येथील स्थानिक न्यायालयाने शनिवारी ही याचिका स्वीकारली असून त्यावर १५ मे रोजी सुनावणी होणार आहे.

‘मुलाला 2006 मध्ये अमेरिकेला पाठवले’
या संपूर्ण प्रकरणाबाबत 61 वर्षीय भेलचे सेवानिवृत्त अधिकारी एसआर प्रसाद म्हणाले, “मला एक मुलगा आहे. मी माझी सर्व बचत त्याच्या संगोपन आणि शिक्षणावर खर्च केली. मी त्याला 2006 मध्ये पायलट प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी अमेरिकेला पाठवले. त्यासाठी ५० लाख रुपये खर्च केले.”
लग्नाला 6 वर्षे झाली –

मुलाला लवकरच एका खासगी विमान कंपनीत पायलटची नोकरी मिळाली. माझी 57 वर्षीय पत्नी अनेकदा आजारी असल्याने आम्ही त्याचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. शेवटी, 2016 मध्ये त्याने लग्न केले. त्यानंतर आता निवृत्त झाल्यानंतर आम्हाला वेळ घालवायला एक नातू मिळेल असं वाटलं. पण, लग्नाला जवळपास सहा वर्ष उलटून गेली आहेत. तरीही यांना मुले झाली नाहीत. आम्हाला खूप मानसिक त्रास सहन करावा लागतोय, असंही त्यांनी सांगितलं.

“माझा मुलगा आणि सून नोकरीमुळे दोन वेगवेगळ्या शहरात राहत आहेत. त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. आम्ही आमच्या सुनेला आमच्या स्वतःच्या मुलीसारखे वागवले. आम्ही तिला हे देखील सांगितले की जर तिला तिच्या नोकरीमुळे मुलाची काळजी घेण्याची काळजी वाटत असेल तर ती मूल आम्हाला देऊ शकते जेणेकरुन आम्ही तिचे पालनपोषण करू त्याची काळजी घेऊ. आमच्याकडे कमी पैसे शिल्लक आहेत. कारण आम्ही सर्व खर्च यांच्यावर केला आहे”, असं प्रसाद म्हणाले.

देशातील पहिलंच प्रकरण : वकील

वकील अरविंद श्रीवास्तव यांनी दावा केला की, उत्तराखंड आणि बहुधा देशातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. पालकांच्या दृष्टिकोनातून त्यांची मागणी रास्त आहे. त्यांच्या अपेक्षा चुकीच्या नाहीत. सुनावणीच्या दिवशी कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत प्रकरणाचा अहवाल मागवला जाईल. त्यानंतर या दाम्पत्याचा मुलगा आणि सुनेला नोटीस बजावून न्यायालयात जाब विचारला जाईल, असं वकिलांनी सांगितलं.