नाणार रिफायनरी प्रकल्प विदर्भात आणा- आशीष देशमुख

139

मुंबई, दि.३० (पीसीबी)- रत्नागिरी जिल्ह्य़ातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असल्याने हा प्रकल्प विदर्भात हलवण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस नेते व माजी आमदार आशीष देशमुख यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

देशमुख यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि औद्योगिक विकासात मागे पडलेल्या विदर्भातील नागपूरच्या औद्योगिक वसाहतीत हा प्रकल्प स्थानांतरित करण्याची विनंती केली. यापूर्वी  देशमुख यांनी २३ एप्रिल २०१९ ला उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी ठाकरे यांनी हा प्रकल्प विदर्भात हलवण्यास सहमती दर्शवली होती हे येथे उल्लेखनीय.

रत्नागिरीच्या नाणार येथील तीन लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प प्रस्तावित आहे. रत्नागिरी येथे हा प्रकल्प करण्यास शिवसेनेचा विरोध आहे. माजी आमदार आशीष देशमुख यांनी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित  केला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात असा एक प्रकल्प विदर्भात आणण्याबाबत पतंप्रधानांशी चर्चा करणार असल्याचे सभागृहात सांगितले होते. त्याच पुढे काही झाले नव्हते.

हा प्रकल्प विदर्भात आल्यास उद्योगधंद्यांना गती मिळेल. तसेच रोजगार निर्मिती होईल. पानिपत, भटिंडा, दिल्ली, बिना, गोवाहाटी इत्यादी ठिकाणी इनलँड रिफायनरी प्रकल्प आहे. या सर्व रिफायनरी बंदराशी पाईप लाईनने जोडण्यात आल्या आहेत.

ही पाईपलाईन समृद्धी एक्सप्रेस वेच्या बाजूने टाकणे सहज शक्य आहे. सिमेटसाठी लागणार पेटकोक, सिंथेटिक यार्न व डांबर निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल या प्रकल्पातून उपलब्ध होणार आहे,असा दावा देशमुख यांनी केला आहे.

WhatsAppShare