नाणार प्रकल्प लादणार नाही; पण कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प कोकणात होणारच – मुख्यमंत्री

65

नागपूर, दि. ११ (पीसीबी) – कोकणातील नाणार प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पावरील विधान परिषदेत झालेल्या मंगळवारच्या चर्चेत गदारोळ झाला. ‘सरकार जनतेवर प्रकल्प लादणार नाही. विरोधकांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, पण कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होणारच’, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. विरोधक आणि सत्ताधारी भाजप दाेघांनी या चर्चेत शिवसेनेची कोंडी केल्याचे दिसले. दुटप्पी भूमिकेबद्दल विरोधकांनी शिवसेनेला मात्र चिमटे काढले.

काँग्रेसचे संजय दत्त यांनी नाणारसंबंधी लक्षवेधी मांडली. त्याच्या उत्तरात मुख्यमंत्री म्हणाले, ‘हा प्रकल्प फोर्थ जनरेशनचा आहे. यातून रसायन, धूर, विषारी वायू असे काही बाहेर पडणार नाही. २५०० प्रकल्पग्रस्तांनी नाहरकत पत्रे दिली आहेत. प्रकल्पाचा सामाजिक-आर्थिक परिणाम अभ्यासण्याचे काम गोखले अर्थशास्त्र संस्था (पुणे), आयआयटी (मुंबई) व निरीला (नागपूर) दिले आहे. काहींचा प्रकल्पास विरोध आहे. त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल. प्रकल्प जनतेवर लादणार नाही’.

नाणार जाणार की राहणार व अधिसूचनेचे काय झाले, याविषयीचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, एमआयडीसी जमिनीसंदर्भातल्या भूसंपादनाच्या अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार उद्योग मंत्र्यांना आहे. मात्र, नाणारचे भूसंपादन वेगळ्या कायद्यान्वये होणार आहे. त्यामुळे याची अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार शक्तिप्रदत्त समिती व मुख्यमंत्र्यांनाच आहे.’ उद्योग मंत्र्यांना अधिकार नाही, तर सुभाष देसाई यांनी अधिसूचना रद्द करत आहे, अशी घोषणा का केली, असा जाब विरोधकांनी विचारला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय उद्योग विभागाचा होता, पण शासनाचा निर्णय झालेला नाही, असे त्यांनी सांगितले.