‘नागरिकांना हक्क मिळवून देण्याचे काम शहर कॉंग्रेस करेल’ – कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम

36

पिंपरी, दि.12 (पीसीबी) – समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत कॉंग्रेसची विचारधारा पोहचविण्याचे काम पक्ष श्रेष्टींनी माझ्यावर दिले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपाने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. ज्या प्रमाणात महापालिका कर आकारते त्या प्रमाणात आरोग्य, पाणी, रस्ते याच्या सुविधा मिळत नाहीत. या भ्रष्ट कारभारावर आवाज उठवण्याचे आणि सामान्य नागरिकांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचे काम यापुढे शहर कॉंग्रेस करेल असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी मंगळवारी (दि.12) चिंचवड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, राष्ट्रीय सेवा दलाचे सचिव संग्राम तावडे, महिला कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, माजी महापौर कविचंद भाट, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, युवक शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्यांक विभाग प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, एनएसयूआयचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, एनएसयूआयचे शहराध्यक्ष डॉ. वसिम इनामदार, एनएसयूआयचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे, सेवा दलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, असंघटीत कामगार कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, माजी नगरसेवक सद्‌गुरु कदम, विश्वास गजरमल, शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष शाम अगरवाल, मागासवर्गिय सेलचे शहर कार्याध्यक्ष विजय ओव्हाळ, इस्माईल संगम, शहर सरचिटणीस सज्जी वर्की, इंटकचे शहराध्यक्ष एम. तिरुमल, एनएसयूआय माजी शहराध्यक्ष निखिल भोईर, पिंपरी युवक कॉंग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, सौरभ शिंदे, सुनिल राऊत, वकिल प्रसाद गुप्ता, शोभाताई पगारे, देवानंद गुप्ता, शाकीब खान, जितेंद्र छाबडा, हरिनारायण, रोहित भाट, रविंद्र नांगरे आदी उपस्थित होते.

अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपा दिवसाढवळ्या करदात्या नागरिकांच्या पैशाची लूट करीत आहे. अनागोंदी कारभार करुन काही नेते सिंडीकेट चालवितात. त्यांना एक्सपोज करण्याचे काम पुढील काळात शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या माध्यमातून केले जाईल असे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे म्हणाले.

डॉ. कैलास कदम म्हणाले की,पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या रिक्त झालेल्या शहराध्यक्ष पदावर कॉंग्रेसचे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी मला ७ ऑक्टोबर रोजी नियुक्त पत्र दिले. कॉंग्रेस पक्ष श्रेष्ठींनी माझ्यावर सोपावलेली ही जबाबदारी यशस्विरित्या पार पाडेल. पिंपरी चिंचवड कामगार नगरीचा नावलौकिक वाढविण्यामध्ये येथील स्थानिक शेतकरी भूमिपुत्रांचे खूप मोठे योगदान आहे. तसेच कामगारांच्या श्रमामुळे या शहराला आता आंतरराष्ट्रीय पातळीवर एक स्वतंत्र उद्योग नगरी, आय. टी. हब, क्रीडानगरी म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

शहराच्या स्थापनेत आणि पायाभरणीत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, स्व. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, स्व. खा. अण्णासाहेब मगर तसेच स्व. माजी मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांचेही खूप मोठे योगदान आहे. लोकनेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, यांनी या शहराला नियोजित विकास नगरी म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली. या शहरात म.न.पा मध्ये अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता होती ही सत्ता भ्रष्टाचारी भाजप कडून पुन्हा मिळवणे हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते यशस्वी होऊ मी शहर काँग्रेस तसेच इंटकच्या माध्यमातून प्रदेश इंटक सह इंटकच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत काम करीत आहे. इंटक, कामगार संघटना संयुक्त कृती समितीची पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून ही काम करीत आहे. कामगार आणि शेतकरी यांच्या शहरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांवर वेळोवेळी आंदोलन करून जनजागृती करीत आहे. तसेच मनपा मध्ये मागील साडेचार वर्षापासून भाजपाचा सुरू असणारा भ्रष्टाचार शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या यामध्ये पाठपुरवठा योजना असेल प्रलंबित विकास कामे असतील पवना बंद जलवाहिनी, बीआरटी अशा विविध प्रश्नांवर मी पक्षाच्या माध्यमातून आवाज उठवणार आहे. यासाठी शहरातील माजी अध्यक्षांना सल्लागारांना काँग्रेसच्या सर्व जुन्या जाणत्या आपल्या कार्यकर्त्यांना माजी नगरसेवक, नगरसेविका आजी-माजी प्रदेश पदाधिकारी, महिला, युवक, विद्यार्थी, कामगार या सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे. 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी करण्यासाठी वेळ कमी आहे तरी देखील शक्य तेवढ्या लवकर मी शहर कार्यकारणी जाहीर करणार आहे. या कार्यकारणी मध्ये सर्व समाजातील सर्व समाज घटकांना सहभागी करून घेण्याचे नियोजन आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

WhatsAppShare