नवी सांगवीत लिफ्ट देणे पडले महागात; दुचाकीस्वाराला मारहाण करुन पाकीट पळवले

572

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – लिफ्टचा बहाणा करत दोघा चोरट्यांनी एका दुचाकीस्वराला जबर मारहाण करुन त्याचे पैशांचे पाकीट जबरदस्तीने चोरुन नेले. ही घटना गुरुवारी (दि.२३) पहाटे साडेचारच्या सुमारास नवी सांगवी येथील राजमुद्रा हॉटेल शेजारी असलेल्या गणेशनगरमध्ये घडली.

अमोल सुरेश भुजबळ (वय ३२, रा. सागर मानसी अपार्टमेंट, कवडेनगर, नवी सांगवी) असे मारहाण होऊन लुटण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने सांगवी पोलिसात तक्रार दाखळ केली आहे. त्यानुसार योगेश जगन शिंदे (वय २०) आणि त्याचा १६ वर्षीय अल्पवयीन साथीदार (दोघेही.रा. विद्यानगर, पिंपळेगुरव) या दोघांविरोधात सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास फिर्यादी अमोल भुजबळ हा त्याच्या दुचाकीवरुन नवी सांगवीतील राजमुद्रा हॉटेल शेजारुन जात होता. यावेळी आरोपी योगेश आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराने लिफ्टचा बहाणा करुन अमोलच्या गाडीवर बसले तसेच त्याला निर्जनस्थळी थांबवून जबर मारहाण करुन अमोलचे पाकीट जबरदस्तीने चोरुन नेले. सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील तपास करत आहेत.